>>>>>अतुल नागदेवे | भंडारा चौफेर
आगामी विधानसभेच्या निवडणुकीत विरोधकांना मते देऊन काही फायदा होणार नाही. विरोधकांचे कोणी ऐकणार नाही. केंद्रात जाऊन कामे करण्याची धमक फक्त महायुतीच्या नेत्यांमध्ये आहे. विशेष म्हणजे केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंग चौहान हे गोंदिया जिल्ह्याचे जावई आहेत. त्यामुळे गोंदिया-भंडाऱ्यातील शेतकऱ्यांना ते रिकाम्या हाताने पाठवणार नाहीत.
असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन सन्मान यात्रेच्या कार्यक्रम प्रसंगी शनिवारी (दि. २८) तुमसर येथे बोलत होते. लोकसभेच्या निवडणुकी विरोधकांनी संविधान बदलणार असल्याचे सांगून तुमची दिशाभूल केली. मात्र, संविधान कोणी बदलू शकत नाही हे लक्षात ठेवा.
हेही वाचा : अमित शहांनी दिला विजयाचा कानमंत्र
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यास तुमच्या जीवनात काही एक फरक पडणार नाही. भंडारा-गोंदिया जिल्ह्याचा जेवढा विकास आम्ही केला ती करण्याची विरोधकांमध्ये धमक नाही. शेतकऱ्यांचे काही प्रश्न केंद्राकडून सोडवून आणावे लागतात.

हेही वाचा : जनतेच्या मनातल्या ‘CM’ चा अस्तित्वासाठी संघर्ष
विकासासाठी निधी खेचून आणावा लागतो. महाविकास आघाडीला निवडून दिल्यास त्यांचे उत्तर ठरलेले राहणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले. महायुती सरकारने लाडकी बहीण योजना, कृषीपंप वीज माफी यासारख्या योजनांची माहिती महिलांना सांगताना काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे नेते फक्त आरोप करतात, असेही यावेळी त्यांनी सांगितले.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर अजित पवार यांनी महायुतीबरोबर लोकसभा निवडणूक लढविली. मात्र लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांना अपेक्षित यश मिळाले नाही. त्यानंतर काही दिवसांनर आलेल्या विधानसभा निवडणुकीची तयारी राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे. निवडणुकीसाठी राज्याच्या अर्थसंकल्पात विविध लोकप्रिय योजनांची घोषणा करण्यात आली आहे.
हेही वाचा : सिंदीपार ग्रामस्थांनी केली राजकिय नेत्यांना गावबंदी
तसेच ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीकडून केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसकडून जन सन्मान यात्रा तुमसर येथे आयोजित करण्यात आली.
आम्ही जय हिंद आणि जय भीम म्हणणारे!
केंद्रात आपले सरकार नाही, आमचे तिथे कोणी ऐकतच नाही, अशी उत्तरे देऊन ते बोळवण करतील. संविधान बदलणार, अशी भीती दाखवून लोकसभेच्या निवडणुकीत विरोधकांनी तुमची मते घेतली अन दिशाभूल केली. आताही केंद्रात मोदी यांचेच सरकार आहे.
संविधानाला कोणी हात लावलेला नाही. आम्ही जय हिंद आणि जय भीम म्हणणारे आहोत. त्यामुळे कोणी घाबरून जाण्याचे कारण नाही. कोणालाही एकटे सोडणार नाही, असा धीरही यावेळी अजित पवार यांनी कार्यक्रमाला आलेल्या दलित, मुस्लिम, आदिवासी बांधवांना दिला.

