>>>>>शमीम आकबानी | भंडारा चौफेर
अनुसूचित जातीकरिता राखीव असलेला भंडारा विधानसभा मतदार संघ हा भाजपला मिळावा. या मतदार संघातून भाजप कार्यकर्त्यालाच उमेदवारी मिळावी, याकरिता स्थानिक भाजप पदाधिकारी कमालीचे आक्रमक झाले आहेत. भंडारा मतदारसंघातून शिंदे सेनेचे समर्थक अपक्ष आमदार नरेंद्र भोंडेकर हे आमदार आहेत. त्यामुळे हा मतदारसंघ शिंदे सेनेकडे जाईल, अशा शक्यता असताना भाजप पदाधिकाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत महायुतीत सर्व काही आलबेल नसल्याचे दाखवून दिले आहे.
भंडाऱ्यात भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी ठराव घेऊन ही जागा न मिळाल्यास वेगळा निर्णय घेऊ, असा इशारा दिला आहे. काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत भंडारा विधानसभा भाजपला सोडण्यावर या पदाधिकाऱ्यांचे एकमत झाले असून, ही भावना उद्या नागपूर दौऱ्यावर येत असलेल्या भाजपचे वरिष्ठ नेते तथा देशाचे गृहमंत्री अमित शहा व उपमुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांना कळविणार असल्याची माहिती भाजप तालुकाध्यक्ष विनोद बांते यांनी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना दिली. लोकसभा निवडणुकीत शिवसेना समर्थक अपक्ष आमदाराने महायुतीचा धर्म पाळला नाही, असा ठपका ठेऊन लोकसभेतील पराभवानंतर भाजपने भंडारा विधानसभेची जागा भाजपला देण्यात यावी, यासाठी भाजप पदाधिकाऱ्यांनी प्रदेशाध्यक्षांना साकडे घातले आहे.
दरम्यान, परिसीमन आयोगाने केलेल्या मतदार संघाच्या पुन:रचनेपूर्वी भंडारा आणि अड्याळ-पवनी असे दोन स्वतंत्र मतदार संघ होते. त्यावेळी जागा वाटपात पवनी शिवसेनेकडे तर भंडारा भाजपकडे होता. त्यावेळी शिवसेनेला कधीही पवनी विधानसभा निवडणूक जिंकता आली नाही. याउलट भाजपाचे राम आस्वले १५ वर्षे आमदार राहिले. दोन विधानसभा क्षेत्र एक झाल्यानंतर हा मतदार संघ शिवसेनेच्या वाट्याला गेला. भाजपने केलेली पक्षबांधणी आणि तळगाळातील लोकांना जोडल्यामुळे शिवसेनेला जागा जिंकता आली. परंतु या यशात सर्वाधिक वाटा भाजपचा होता.
दरम्यान एप्रिल महिन्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना (शिंदे) समर्थक अपक्ष आमदाराने युतीधर्माला बगल देऊन भाजप उमेदवाराला मदत केली नाही, असे आरोप पदाधिकाऱ्यांनी केला आहे. स्थानिक आमदारांच्या व्यवहारामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये असंतोष पसरला आहे. त्यामुळे भंडारा विधानसभा क्षेत्र भाजपला देण्यात यावे, अशी मागणी या पदाधिकाऱ्यांनी रेटून धरली आहे. या मुद्यांवरून भाजप आणि सेनेत चांगलेच फाटल्याचे संकेत दिसत असून येत्या निवडणुकीत त्याचे कोणते पडसाद उमटतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
भाजप आणि कमळ हाच आमचा आग्रह
भंडारा पवनी मतदार संघात कार्यकर्त्यांना कमळाचे निवडणूक चिन्ह हवे आहे. आमचा कोणत्याही व्यक्तीला विरोध नसून, भाजपचा आमदार कसा निवडून येईल, हे आमच्यासाठी महत्वाचे आहे. भाजप आणि कमळ हाच आमचा आग्रह आहे.
अनुप ढोके,
भाजप भंडारा विधानसभा प्रभारी
भावना पक्षश्रेष्ठींपर्यत पोहचविणे गरजेचे
सन २०१४ व २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत युती धर्म शिवसेनेकडून पाळला गेला नाही हे सर्वश्रृत आहे. आम्हाला युती धर्म पाळण्यास सांगणाऱ्यांनी सुरूवातीला आपण मागील दोन निवडणुकीत काय केले याचे आत्मपरिक्षण करावे. भाजप कार्यकर्त्यांची भावना पक्षश्रेष्ठींपर्यंत पोहचविणे गरजचे असल्याने ती पोहचविण्यासाठी तसेच हा मतदार संघ भाजपला कसा सुटेल, यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करणार आहोत.
विनोद बांते, भाजप तालुकाध्यक्ष, भंडारा.