>>>>>>भंडारा चौफेर | विशेष प्रतिनिधी
संघ परिवाराच्या विचार आणि रचनेतून तयार झालेल्या भाजपाने राष्ट्रहिताच्या विचाराने प्रेरित होत देशात २०१४ ते २०१९ या काळात आपला विस्तार वाढला. संघाच्या मुशीत वाढलेल्या जनसंघापासून भाजपापर्यंत प्रवास करणाऱ्या निष्ठावंत भाजपा नेत्यांनी पक्षाला जगातील सर्वाधिक सदस्य संख्या असलेला पक्ष म्हणून नावारूपाला आणले.
आता संघाच्या सामाजिक समरसतेच्या उद्दिष्टाची कसोटीच आगामी विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने महाराष्ट्रात होणार आहे, असे आजचे सामाजिक प्रश्न आणि मुद्दे बघता दिसते. कारण, रचनेचा पाया ‘कार्यकर्ता’ राहिलेल्या कार्यकर्ताधिष्ठित भाजपाचा महाराष्ट्रातील प्रवास संभ्रमित कार्यकर्ता संघटनेकडे सुरू झाल्याचे सध्याचे चित्र आहे. असे असलेतरी एकंदरीत महाराष्ट्रातील राजकिय सद्यपरिस्थिती बघता विधानसभेच्या निवडणुकीत भाजपाचा विषय लई हार्ड हाय ए… असे राजकिय पंडितांचे मत आहे.
महाराष्ट्रात भाजपा रुजली, वाढली याचे कारण फक्त तत्कालीन सत्तेतील काँग्रेसबद्दलच्या नाराजीत नाही तर भाजपच्या रचनात्मक नियोजनातही आहे. जनसंघापासून महाराष्ट्रातले अस्तित्व, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पाठबळ, मध्यमवर्ग आणि इतर सामाजिक घटकांसोबत सामाजिक समरसतेचा उपक्रम, माधवम सारखे सामाजिक अभियांत्रिकीचे प्रयोग यामुळे भाजपाचा महाराष्ट्रात स्वतंत्र जनाधार तयार झाला.
दरम्यान, भाजपाच्या महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या तयारीची सूत्रे केंद्रीय पक्षाने नेमून दिलेल्या प्रभारींच्या हातात आहेत. त्यांच्या नियोजनाचा भर कार्यकत्याशी प्रत्यक्ष संवाद साधून संघटनेला सक्रिय करण्यावर आहे.
त्यासाठीच्या प्रवासाचे आणि स्थानिक बैठकांचे नियोजन भाजपा करत आहे. भरपूर पदे, मोठमोठ्या नावाचे उपक्रम किंवा यात्रा यांचा समावेश टाळून ‘मंडळ प्रमुख आणि त्यावर आधारित बूथ रचनेला भक्कम करण्याकडे पक्षाने लक्ष दिले आहे.
प्राथमिक स्तरावर मतदार याद्यांवरही बरेचसे काम झाल्याचे दिसते आहे. राज्य भाजपाच्या निर्णय प्रक्रियेतही सांघिक नेतृत्वावर भर देऊन जातीय समतोल साधण्याचा प्रयत्न केंद्रीय पातळीवरून होतो आहे. रचनेत सर्व नेत्यांना सामावून घेताना डिजिटल माध्यमातून होणाऱ्या तर्कवितकांमुळे कार्यकर्त्याच्या मनात संभ्रम वाढतो, याची दखल पक्षाला घ्यावी लागणार आहे. या संपूर्ण प्रक्रियेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी समन्वयावर काळजीपूर्वक लक्ष दिले जात आहे.
लोकसभा निवडणुकीत झालेल्या नुकसानीनंतर पिछाडीवर गेलेल्या भाजपामध्ये कार्यकत्यांमधील संभ्रम आणि नेत्यांमधील स्पर्धा अजूनही कमी झाल्याचे दिसत नाही. ‘फेक नरेटिव्ह’च्या लढाईत हरलो, अशी मांडणी महाराष्ट्र भाजपाचे नेते आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी निकालानंतर केली. कार्यकर्त्यांना वेळोवेळी जोमाने काम करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. संघटना ही भाजपाची ताकद आहे. त्यामुळे, विधानसभेच्या तयारीत संघटनात्मक ताकदीवर भर दिला जात असून तसे पक्षपातळीवर काम सुरू आहे.
‘परिवार में जिस तरह माँ होती है। उसी तरह हमारे लिए हमारी पार्टी है।’ असे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे नुकतेच म्हणाले. प्रत्यक्षात, केंद्रीय आणि राज्य पातळीवर केलेल्या राजकीय तडजोडी कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवण्यात पक्ष कमी पडल्याचे लोकसभा निवडणुकीत दिसले होते.
शिवाय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या लांबलेल्या निवडणुका महामंडळ आणि इतर लाभाच्या रखडलेल्या नियुक्त्या यामुळे सत्तेत सहभागी असूनही सत्तेच्या लाभापासून कार्यकर्ता वंचित राहिला. स्थानिक इच्छुकांची संख्या वाढत गेली. त्याचेही परिणाम लोकसभा निवडणुकीच्या प्रचारातही समोर आले.
महाराष्ट्रात २०१४ नंतर भाजपचा स्वतंत्र नवीन अध्याय सुरु झाला. याचे नेतृत्व देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे. त्यामुळे गेल्या दहा वर्षांतल्या सर्व रचनेवर त्यांचा प्रभाव आणि पकड आहे. या काळात वाढलेल्या भाजपामध्ये सत्तेसोबत सहभागी होणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. मात्र, भाजपाच्या जुन्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांची मात्र पीछेहाट झालेली दिसते.
शिवाय, स्थानिक पातळीवर नवे, व्यापक जनाधार निर्माण करू शकणारे नवे चेहरेही उभे करण्यातही पक्षाला मर्यादा आल्याचे दिसते. याचे कारण, स्थानिक पातळीवर आपले राजकीय आणि त्यावर आधारित संस्थात्मक अस्तित्व टिकविण्यासाठी भाजपा विरोधी पक्षातील अनेक नेतेमंडळींनी २०१९ विधानसभेला भाजपासोबत येणे पसंत केले. त्यामुळे, पक्षातील कार्यकत्यांच्या संधी आकुंचन पावल्या.
आता, बदललेल्या राजकीय परिस्थितीत मर्यादित झालेल्या संधींमध्ये या नेत्यांची घरवापसी अनेक ठिकाणी होते आहे. आता, त्यांना सोबत ठेवण्यात फडणवीस किती यशस्वी ठरतात, हे पाहणे औत्सुक्याचे आहे. विधानसभेची २०२४ ची निवडणूक अत्यंत आव्हानात्मक असणार आहे. अशावेळी व्यक्तिगत राजकीय स्वार्थ की पक्षाचे हित हा निर्णय प्रत्येक नेत्याला आणि कार्यकर्त्यांला घ्यावा लागणार आहे.

