>>>>>रवी भोंगाने | भंडारा चौफेर
राजकीय क्षेत्र हे अस्थिरतेने भरलेले क्षेत्र आहे. राजकारणाएवढी अस्थिरता दुसऱ्या कोणत्याच क्षेत्रात बघायला मिळत नाही. क्षणात ‘अर्ष ते फर्ष पर ‘अशी अवस्था राजकारणात नेहमीच पाहिली जाते.राजकारणात जशी सत्ता कायम नसते तसे पद देखील कायम नसते तसेच मैत्री आणि शत्रुत्वही कायमस्वरूपी नसते.
राजकीय क्षेत्रात मतलब पाहून मैत्री आणि शत्रुत्व केले जाते. कोणे एकेकाळी दुश्मन असलेले राजकीय शत्रू क्षणार्धात पक्के मित्र होत असतात.एकूणच राजकीय क्षेत्रात कोणतीही परिस्थिती कायमस्वरूपी नसते. त्याप्रमाणे जसजशी निवडणुकीची तारीख जवळ येईल तसतसे अनेक भावी उमेदवारांचे बी.पी.,शुगर हॉय होत जाईल.
आतापासून साकोली विधानसभा क्षेत्रात उमेदवारांचे राजकीय युद्ध सुरू झाले आहे. त्यानुसार साकोली विधानसभा क्षेत्र हॉय व्होल्टेज मोडवर दिसून येत आहे. सध्या साकोली विधानसभा क्षेत्र सोशल मीडिया, युट्यूब,बातम्या आणि विविध कार्यक्रमातून प्रचंड चर्चेत आहे. भावी मुख्यमंत्र्यांचे विधानसभा क्षेत्र म्हणून या क्षेत्राकडे बघितल्या जाते. आ.नाना पटोले यांना राजकीय खिंडीत गाठण्यासाठी भाजपचे अनेक मावळे दबा भरून बसले आहेत.इकडे भाजपमध्ये उमेदवारीसाठी कुरघोडी सुरू आहे.
उमेदवारीचा दावेदार मीच आहे अशा अविर्भावात सर्वच दिसून येतात.पण हमखास कुणाला तिकीट मिळेल हे सांगता येत नाही. मात्र एक गोष्ट नक्की डॉ.परिणय फुके हे विधान परिषदेवर गेल्याने ते दुसऱ्यांदा साकोली विधानसभा लढविण्यास इच्छुक असतील असे वाटत नाही.मात्र इथेच राजकीय शॉक बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.
साकोली विधानसभा क्षेत्रात तेली समाजाचे प्रतिनिधित्व(उमेदवार) म्हणून शिवराम गिऱ्हेपुंजे यांना अनेक वर्षापुर्वी उमेदवारी दिल्या गेली.पण तो काळ वेगळा होता.नवीन पिढीकडे पात्रता आणि क्षमता असूनही पक्षाकडून नविन पिढीने अन्याय का सहन करावा ?शेवटी हे राजकारण आहे. राजकारणाचा रस्ता पाहिजे तेवढा सरळ नाही. येथे तिरकी चाल चालावी लागते.
लोकसभेच्या निवडणुकीत विद्यमान भंडारा- गोंदिया जिल्ह्याचे खासदार म्हणजे डॉ. प्रशांत पडोळे यांना उमेदवारी मिळेल हे शेवटपर्यंत कुणालाच कळले नाही.सध्या साकोली विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सर्वांचे फलकांवर अवतरण कार्य सुरू आहे.माजी आ.बाळा काशिवार मनापासून लढण्यास इच्छुक आहेत की नाही हे माहीत नाही.
परंतु आज त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जमलेली गर्दी माजी आ.बाळा काशीवार टॉपर असल्याचे सुचित करते.सध्याला तरी राजकीय रंगपंचमीचा खेळ भाजपमध्ये सुरू आहे.साकोली विधानसभा क्षेत्रात ओबीसी मतदाराची जातीनिहाय माहिती जर समोर आणली तर पहिल्या क्रमांकावर कुणबी, त्यानंतर तेली आणि कोहळी असा क्रम लागतो.
असे असतांना तुमसर विधानसभेचे निमित्त करून साकोली विधानसभेतील तेली समाजाचे प्रतिनिधीत्व नाकारणे हे तेली समाजावर अन्याय करण्यासारखे आहे,असे मतदार आता बोलू लागले आहेत.मागील विधानसभेत डॉ. ब्रह्मानंद करंजेकर यांनी पक्षाकडे तिकीट मागितली ती नाकारण्यात आली. अपक्ष म्हणून त्यांनी पूर्ण ताकदिनिशी तयारी केली. अपक्ष म्हणून ते प्रबळ उमेदवार राहिले असते असे त्यावेळी बोलल्या गेले.पण त्यावेळी पक्षश्रेष्ठीचा मान ठेवून पक्षाविषयी निष्ठा ठेवली आणि नम्रपणे माघारही घेतली.

मात्र, आता त्यांचे सुपुत्र वैनगंगा बहुउद्देशीय विकास संस्थेचे अध्यक्ष डॉ.सोमदत्त करंजेकर हे उमेदवारीसाठी दावेदारी करीत आहेत.अशावेळी पक्ष श्रेष्ठींनी त्यांच्या उमेदवारीचा विचार करायला हरकत नाही.जय पराजय हा नंतरचा प्रश्न ? पण तेली समाजाला या क्षेत्रात भाजपाने प्रतिनिधित्व देऊन या क्षेत्रात भरपाई करावी अशी चर्चा आता जोर धरू लागली आहे.
वैद्यकीय क्षेत्रातील नवीन चेहरा म्हणून आ.नाना पटोले यांनी डॉ.प्रशांत पडोळे यांना हॉयटेक केले तर उच्च विद्याविभूषित,शैक्षणिक, सामाजिक,धार्मिक,व्यवसायिक, सांकृतिक क्षेत्रात नवीन दालने उघडू पाहणारे डॉ.सोमदत्त करंजेकर यांच्याकडे भाजपने लक्ष वेधायला हरकत नाही.विधानसभा क्षेत्रात जशी राजकीय हवा असते तसे वेळोवेळी लिखाण करायचे असते. वेगवेगळ्या नेत्यांशी, मतदारांशी आणि कार्यकर्त्यांशी खाजगीत बोलण्याची अनेकदा संधी मिळते.त्यातून बरेच काही कळते.कोण जिंकून येणार हा या घडीचा खेळ आहे.तो रंगायला अजून वेळ आहे.