>>>>शमीम आकबानी | भंडारा चौफेर
पूर्व विदर्भासह राज्यात लोकसभेच्या निवडणुकीत मायबाप जनतेने काँग्रेसवर विश्वास ठेवत महायुतीला म्हणजे मुख्यत्वे भाजपाला पराभवाची धूळ चारली. 2024 च्या लोकसभा निवडणुका पार पडल्या आहेत. यामध्ये राज्यातील अनेक मतदारसंघ चर्चेत होते त्यात भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाचा समावेश होता.
काँग्रेसचे नवख्या डॉ. प्रशांत पडोळे यांना उमेदवारी देत निवडणूक लढवली आणि खासदार झाले. या निवडणुकीत महाविकास आघाडीने महायुतीचा दारूण पराभव करीत संपूर्ण राज्यात विजयाचा झेंडा उभारला. या संपूर्ण विजयाचे शिल्पकार काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना मानले जात आहे. नाना भाऊंनी आपल्या राजकीय कौशल्याने प्रतिपक्षाला धूळ चारली.
दरम्यान, याच पार्श्वभूमीवर आगामी विधानसभा निवडणूक सुद्धा महाविकास आघाडीच जिंकेल. महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांमध्ये सामंजस्य आहे. सर्व मिळून महायुती विरोधात दमखमाने लढू अशी भूमिका पटोले यांनी स्पष्टच केली आहे.
लोकसभेत महायुतीला मोदी पॅटर्नचा फायदा झाला नाही. उलट मतदानाची टक्केवारी पाच टक्क्याने घटली. जर यावेळी भाजपाने मुख्यमंत्री पदाचा मुख्य चेहरा जाहिर केला तर टक्केवारी किती पटीने घटेल हे सांगता येणार नाही असा टोलाही पटोले यांनी भाजपाला लगावला आहे.
बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न , पाणीटंचाईचा प्रश्न इ. मुख्य मुद्दे बाजूला सारून भाजपने जनतेचा विश्वास गमावलेला आहे. जनतेच्या समस्यांचे निवारण करण्याऐवजी राज्याची संपत्ती बँकेकडे गहाण ठेवून व त्यावरती कर्ज उचल करणाऱ्या सरकारने हा भ्रष्टाचार वेळीच थांबवावा असा इशारा व शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव व तरूणांना रोजगार देण्याची मागणी आ. पटोलेंनी केली आहे.
विधानसभेत संघाची भाजपाला साथ
राज्यात दिवाळीआधी किंवा दिवाळीनंतर विधानसभा निवडणूक होणार आहे. दिवाळीनंतरच निवडणूक होण्याची शक्यता अधिक आहे. लोकसभा निवडणुकीत बसलेल्या फटक्यानंतर राज्यात होणाऱ्या विधानसभेसाठी महायुती तयारीला लागली आहे.
लोकसभा निवडणुकीपूर्वी महायुतीचे जागावाटप खूप रखडलेले पाहायला मिळालं. त्यामुळे उमेदवारांची घोषणा, कोणाला कोणती जागा यात वेळ गेला. त्याचा फटका महायुतीला बसला.
मात्र आता जागावाटप लवकर मार्गी लावायचे असे महायुतीने ठरवल्याचे दिसते आहे. तसेच यंदा विधानसभा निवडणुकीत भाजपला यश मिळवून देण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ देखील मैदानात उतरणार असल्याचे समजते आहे.

